नवी दिल्ली 25 मे : भारतात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. भारतात डबल म्युटंट विषाणू दिसून आला आहे. हा म्युटंट विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार आता उपाययोजना सुरू आहेत. ब्रिटनमध्ये आता ट्रिपल म्युटंट कोविड विषाणू सापडला आहे. तो डबल म्युटंटपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूची नवनवी रुपं दिवसेंदिवस अधिक संसर्गजन्य होत असल्यामुळे जगभरातील शास्रज्ञ कोविड लशींचा बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त करत आहेत. कदाचित येत्या वर्षभरात हा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजचे संचालक अँथनी फाउची म्हणाले, की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात येत्या काळात बूस्टर डोस घेणं महत्त्वाचं होणार आहे. तसंच फायझर या लस उत्पादक कंपनीचे सीईओ अल्बर्ट बाउर्ला म्हणाले, ‘ येत्या आठ ते 12 महिन्यांच्या काळात लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो, त्यामुळे आम्ही त्यासंबंधी कामाला सुरुवातही केली आहे.’
बूस्टर डोस कसा काम करतो
आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती आधी घेतलेल्या लसीची क्षमता आठवणीत ठेवते. त्याला इम्युनॉलॉजिकल मेमरी म्हणतात. त्यानंतर ठराविक काळानी बूस्टर डोस म्हणून लसीचा छोटा डोस जरी दिला तरीही तो या आठवणीतल्या लसीच्या क्षमतेला जागृत करतो. त्यानंतर प्रतिकारशक्ती अधिक कार्यक्षमपणे काम करू शकते. साठच्या दशकात शास्रज्ञांना हे लक्षात आलं की लसीचा एकदम मोठा डोस देण्यापेक्षा थोड्या काळानं आपण छोटे छोटे डोस दिले तर अँटीबॉडी व्यवस्थित विकसित होतात.
विषाणूचा म्युटंट काम करू लागला की तो अधिक संसर्गजन्य असतो त्यामुळे लसीच्या आधीच्या डोसमुळे तयार झालेल्या अँटीबॉडी काम करू शकत नाहीत. अशावेळी लसीच्या जुन्या फॉम्युल्यात बदल करून त्याचा बूस्टर डोस दिला जातो.
सध्याच्या लसींचे दोन डोस ठराविक अंतराने दिले जातात त्यांना प्राइम डोस म्हणतात आणि नंतर वर्षभरानी जर डोस द्यावा लागला तर तो बूस्टर डोस असेल. प्रत्येक आजारावरील लसीचा बूस्टर डोस वेगवेगळ्या अंतराने दिला जातो. बूस्टर डोसच्या चाचण्या करताना प्राइम डोस एका कंपनीचा आणि बूस्टर डोस दुसऱ्या कंपनीचा दिला जातो, त्याला हेट्रोलॉगस प्राइम बूस्टिंग म्हणतात. यामुळे अँटीबॉडी अधिक प्रभावी होतात. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्पेनमधील सरकारी संस्था कार्लोस थ्री हेल्थ इन्स्टिट्युटने केलेल्या अभ्यासानुसार एका चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना पहिला डोस अस्ट्राझेनेकाचा दिला आणि दुसरा फायझर लसीचा दिला गेला. 670 जणांवर झालेल्या या अभ्यासात असं दिसून आलं की वेगवेगळ्या लसींचे डोस घेणाऱ्यांच्या शरीरात एकच लस घेणाऱ्यांपेक्षा अँटीबॉडी मोठ्या प्रमाणात वाढल्या.