ताज्याघडामोडी

ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा                                                           

पंढरपूर दि. 21 :  जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत टेस्टींग कराव्यात तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेवून संस्थात्मक अलगीकरण करुन  तात्काळ उपचार करावेत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.

            पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील  कोरोना संसर्गाच्या  प्रतिबंधासाठी करण्यात उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.पिसे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरविंद गिराम,  पोलीस निरिक्षक किरण अवचर, अरुण पवार, प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.

            यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी जाधव म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करुन  तातडीने चाचणी कराव्यात. कोविड हॉस्पिटल बाहेर   मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते तेथेही चाचण्या घेण्यात याव्यात. ग्रामीण भागात रुग्ण वाढू नयेत यासाठी ग्रामस्तराव जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले व उदयसिंह भोसले यांना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्या कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तसेच उपविभागीयअधिकारी विक्रम कदम यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर  करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *