ताज्याघडामोडी

पुणे महापालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याकडून पंढरीतील ५०० कुटुंबाना धान्य वाटप

कोरोनामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून पंढरीत अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांनी येथील ५०० गरजु कुटुंबाना धान्य पाठवून दिले. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.

 घाटे कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून नगरसेवक धीरज घाटे अनेक वर्षा पासून पुणे येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचे पुणे परिसरात मोठे सामाजिक कार्य असून या जोरावर ते नगरसेवक झाले आहेत. दरम्यान पंढरीतील त्यांचे चुलत भाऊ अवधुत घाटे यांनी येथील अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याची माहिती त्यांना कळवली होती. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर फिरत असून मागील सव्वा वर्षात पाचही यात्रा कोरोनामुळे झाल्या नाहीत. याचा मोठा फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसला आहे. याची धीरज घाटे यांनी तातडीने दखल घेवून जवळपास तीन लाख रूपयांचा किराणा माल येथे पाठवून दिला आहे. सदर मालाचे वाटप प्रांताधिकारी ढोले यांच्या हस्ते समस्त उत्पात समाजाच्या उपासना मंदिर येथून करण्यात आले. ढोले यांनी देखील धीरज घाटे यांची पंढरीशी नाळ जुळली असल्याने त्यांनी येथे मदत पाठवली असल्याचे गौरवोद्गार काढले.

 घाटे यांनी पुणे येथे भव्य कोविड रूग्णालय सुरू केले असून आपल्या भागात ते औषधांसह जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करीत आहेत. तसेच पंढरपूर येथील अनेक रूग्णांना पुणे येथील रूग्णालयात बेड मिळवून देण्याचे मोठे काम घाटे यांच्या मार्फत सुरू आहे.

 दरम्यान सदर धान्य वाटप प्रसंगी माजी नगरसेवक शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, भागवत महाजन, ओंकार जोशी, महेश काळे, कैवल्य उत्पात, रोहित पुरंदरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *