मुंबई | मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुन्हा शाळा कधी सुरू होणार? याबाबत सवाल केला जात होता. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 15 जून रोजी सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू, त्या शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याविषयी जारी केलेल्या परित्रकात कोणत्याच मार्गदर्शक सुचना दिल्या गेल्या नाहीत.
त्यामुळे पालक आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या मनात त्यासंदर्भात अनेक प्रश्न उद्धवत आहेत.
अशातच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. सध्या शाळा न सुरू करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कोरोनाची परिस्थिती काहीशी निवळली असल्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यामध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा कशी घ्यायची याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे सगळे विद्यार्थी गोंधळात पडले होते. परंतू, वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीमुळे सगळ्या शंका दूर झाल्या आहेत.