ताज्याघडामोडी

मुलाचं निधन झाल्याचं कळताचं मातेनं सोडला प्राण

तेर, 30 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढतचं चालला आहे. त्यामुळे दररोज असंख्य रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. दरम्यानच्या काळात अनेक कुटुंबं परकी झाली आहेत. तर अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद याठिकाणी अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती कळताचं घरी आईनंही आपला प्राण सोडला आहे. या घटनेनं तेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबादजवळील हिंगळजवाडी येथील रहिवासी असणाऱ्या 50 वर्षीय रमाकांत मधुकर नाईकनवरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं ते लवकरच बरे होतील, अशी कुटुंबीयांना आशा होती. पण गुरूवारी सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताचं 70 वर्षीय आई सुशिला मधुकर नाईकनवरे यांना हृदयविकाराचा झटका आला.

एकिकडे कोरोनामुळं मुलाचं निधन झाल्यानं नाईकनवरे कुटुंबीय दुःख सागरात असतानाच 70 वर्षीय आईचाही हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. एकाच दिवशी अवघ्या काही मिनीटांच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाल्यानं नाईकनवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंगळजवाडी येथील शेतात एकाच वेळी माय लेकरावर अंत्यसंस्कार करण्याला आला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूची दुसरी लाट शहरी भागासह ग्रामीण भागातही अत्यंत घातक ठरत आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संसर्गासोबतचं मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत गंभीर आजार असणारे रुग्ण दगावत होते. मात्र कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत धडदाकट नव्या रक्ताचे तरुणही दगावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *