ताज्याघडामोडी

आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू

लखनऊ, 28 एप्रिल : देशातील कोरोना परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अगदी सत्ताधारी पक्षातील आमदारालाही ICU बेड मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केसर सिंह गंगवार बरेलीतल्या नवाबगंजमधील आमदार. 18 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.पण तिथं त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. सत्ताधारी पक्षाच्याच या आमदाराला बेड उपलब्ध झाला नाही. म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

यूपी भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमदार केसर सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेले हे सत्ताधारी भाजपचे तिसरे आमदार आहे. याआधी औरेयातील आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

उत्तरप्रदेशात आता कोरोनाचं संक्रमण अधिक वेगाने पसरत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. विना मास्क किंवा गमछा घातल्याशिवाय घरातून नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. विना मास्क आढळल्यास 1000 रुपये दंड ठोठवण्यात येत आहे. तर दुसऱ्यांदा विना मास्क आढळून आल्यास 10,000 रुपये दंड ठोठावला जात आहे. तर सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकल्यास त्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *