कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले.
कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी शासनाने दरसूची जारी केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून बिलाची आकारणी होते अथवा नाही यासाठी प्रत्येक बिलाची पडताळणी आवश्यक झाली आहे.दरम्यान, या सर्व हॉस्पीटलच्या बिलाचे अंकेक्षण केले असता शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्याची बाब गतवर्षी उघडकीस आली होती तर अनेक वेळा रुग्णाचे नातेवाईकही या वाढीव व अवाच्या सव्वा बिलाबद्दल तक्रार करताना दिसून येतात. काही रुग्णालयांनी पी.पी.ई.किट चे दर शासन दरापेक्षा अधीक लावला आहे तसेच काही रुग्णालयांनी साधे बेड,ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडचे दर तसेच फिजीशीयन व्हीजीट दर नेहमीच्या अथवा शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा भरमसाठ लावल्याच्या तक्रारी शासनस्तरावर प्राप्त होत आहेत.
खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल अशी घोषणा गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोलापूर भेटीवर असताना केली होती.मात्र आता या दुसऱ्या लाटेस सुरुवात होऊन महिना लोटला तरी अध्यापर्यंत कार्यवाही होत नव्हती.या बाबत पंढरी वार्ताच्या वतीने काल प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला होता.
