गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे.

अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक अब्दुल आसिफ अब्दुल कदिर हे वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात.

त्यांच्याकडे ८० ट्रक असून, देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक त्यांच्या ट्रकमधून होते. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्य व केंद्राचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, सीबीआय प्रमुख, केंद्रीय परिवहन मंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे एक तक्रार ता. २२ एप्रिल २०२१ रोजी दिली आहे.

या तक्रारीनुसार त्यांना ता. २१ एप्रिल २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पाच कर्मचारी किशोर सोनोने, वसीम, अश्विन शिरसाट, व इतर दोन पोलिस कॉन्स्टेबल यांनी वाहनांची तपासणी करण्याच्या कारणास्तव अ. आसिफ यांच्या कार्यालयात जाऊन शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांचे तीन ट्रक स्थानिक गुन्हे शाखेत आणून आठ तास डांबून ठेवले. आसिफ यांनाही कार्यालयात बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या कर्चमाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

हप्ता दिल्याशिवाय व्यवसाय करू देणार नाही!

ट्रान्सपोर्ट संचालक अ.आसिफ यांनी दिलेल्या पत्रात एलसीबीच्या कर्चमाऱ्यांकडून हप्त्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हप्ता दिल्याशिवाय तू व्यवसाय करू शकणार नाही, अशी धमकीही दिल्याचे पत्रात म्हटले आहे. याशिवाय राज्याच्या गृहमंत्र्यांना १० लाखाचा हप्ता द्यावा लागतो, त्यामुळे तू हे दहा लाख रुपये आम्हाला आणून दे, अन्यथा तुझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचा आरोपही अ. आसिफ यांनी पत्रातून केला आहे.

पोलिस अधीक्षकांकडून दखल नाही

अ. आसिफ यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतचे पत्र ता. २२ एप्रिल २०२१ रोजीच पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले होते. त्या पत्राची पोलिस अधीक्षकांकडून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही अ. आसिफ यांनी केला आहे.

गाड्या तपासणीच्या नावाखाली एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शिविगाळ करून मला ता. २१ एप्रिल रोजी एलसीबी कार्यालयात डांबून ठेवले होते. ज्या गाड्या माझ्या नावावर नाही त्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर वकिलांमार्फेत सोडून घेतल्यात. पोलिसांनी एका गाडीची नंबर प्लेट काढून ठेवल्याचे लक्षात आले. त्याबाबत विचारले असता तुझ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली. गृहमंत्र्यांना हप्ता द्यावा लागतो म्हणून १० लाखांची मागणी केली. त्याची तक्रार मी सर्व संबंधितांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *