पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असली तरी या शहरात ”डॉन” आणि फोल्डमॅन ची कमतरता नाही असे म्हटले जाते.पुणे शहरात प्रचंड हवा असलेले नाव म्हणजे गजानन मारणे होय.नुकतेच मोक्का न्यायालयाने त्याची एका हत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्यानंतर मारणे आता तुरूंगातून बाहेर येणार आहे.
अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष झाल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळीतील सदस्य संतोष ऊर्फ पप्पू हिरामण गावडे याच्या खूनप्रकरणीही मारणेसह इतर आरोपींची विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.या खटल्यात बचाव पक्षातर्फे सुधीर शहा,ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. विपुल दुशिंग व ॲड. जितू सावंत, ॲड. राहुल भरेकर आणि ॲड. विद्याधर कोशे यांनी काम पाहिले.
मात्र जे सामान्य जनतेच्या डोळ्याला दिसते,ज्याचा अनुभव सामान्य जनता घेते ते न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी सक्षम पुरावे लागतात.याचीच परिणीती म्हणून गजानन मारणे आता तुरूंगातून बाहेर येणार आहे.
गावडे याचा 3 नोव्हेंबर 2014 रोजी मध्यरात्री लवळे येथील गावडे वस्तीजवळ कोयता, सुऱ्याने वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश ज्ञानेश्वर जाधव (वय 22, रा. कोथरूड) याने पौंड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गजानन मारणे (रा. कोथरूड) याच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल आहे.
एक जण फरार असून, त्यापैकी 17 जणांची मुक्तता झाली. या खुनानंतर गजानन मारणे आणि नीलेश घायवळ या टोळ्यांमध्ये पुन्हा भडका उडाला होता.