गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; बेशुद्ध बहिणीचाही अंत

पुणे : डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्‍टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्‍वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), गितीका सुधीर रॉय (वय 65) असे मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.सुबीर रॉय हे नामवंत नेत्रतज्ज्ञ आहेत. त्यांची येरवडा व विश्रांतवाडी येथे क्‍लिनीक होते.
डॉ.रॉय, त्यांची बहिण गितीका व भाऊ संजय असे तिघेजण एकाच घरात राहात होते.

गितीका व संजय या दोघांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांचे नातेवाईक काही दिवसांपासून डॉक्‍टरांशी संपर्क साधत होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शुक्रवारी त्यांचे नातेवाईक डॉ.रॉय यांच्या घरी आले. तेव्हा, गितीका या हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. तर संजय हे घरामध्येच बसले होते. डॉ.रॉय यांच्या खोलीमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. डेक्कन पोलिस घटनास्थळी गेले. मात्र डॉ.रॉय यांच्या बेडरुमचा दरवाजा बंद होता. ‘
अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी डॉ.रॉय यांचा स्वच्छतागृहामध्ये मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ससूनला हलविला. त्याचबरोबर गितीकालाही ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डॉ.रॉय हे कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, गितीका यांच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचाही मृत्यु झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *