Uncategorized

उजनीच्या ५ टिएमसी पाण्यावर इंदापूरचा डल्ला  

जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा 

 इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व निरा डावा कालव्यावरील 22 गावांच्या शेतीसाठी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने २२ एप्रिल २०२१ रोजी आदेश जारी केले आहेत.या आदेशाची प्रत या फेसबुक पोस्टवर टाकत अत्यंत आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे. या निर्णयाने दोन्ही कालव्यांवरील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून वर्षानुवर्षे तहानलेल्या गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटणार आहे अशी प्रतिक्रिया ना.भरणे यांनी व्यक्त केलेली असतानाच जलसंपदा विभागाच्या या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून मात्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजनांना पाणी देण्यासाठी निधीचे कारण पुढे करीत अन्याय होत आलेला असताना जलसंपदा विभागाकडून अचानकपणे असे आदेश काढून सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला असून त्यामुळे भविष्यात सरकारला संतप्त उद्रेकाचा सामना करावा लागेल असा इशारा धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपा अनुसूचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला आहे.  
                                 या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना धरणग्रस्त लक्ष्मण धनवडे यांनी जलसंपदा विभागाच्या २२ एप्रिलच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होणार असल्याचे सांगत उजनी धरणावर पुणे जिल्ह्यात जवळपास १६ छोटीमोठी धरणे आहेत.टेल टू हेड या निकषावर धरणे भरून घेणे अपेक्षित असताना उजनीवरील सर्व धरणे भरल्यानंतर उजनीत पाणी सोडण्यात सुरुवात होते.सोलापूर जिल्ह्यात जसजशी सिंचन सुविधा वाढत आहे तसतसे उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यासह लघु वितरिकेवर अवलूंबन असलेल्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.वरदायिनी उजनीसाठी सोलापूर जिल्ह्याने मोठा त्याग करून देखील आज धरणाच्या बांधणी नंतर ४० वर्षांनी देखील सोलापूर जिल्ह्यात डाव्या व उजव्या कालव्यावरील उपफाट्याना आणि लघु वितरिकांना पूर्ण क्षमेतेने पाणी सोडले जात नाही.तर मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावासाठी जसा टेंभू -ताकारी -म्हैसाळ योजनेचा आधार आहे तसाच उजनीतून २ टिमसी पाण्याचीही अपेक्षा आहे.तर सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या अक्कलकोट तालुक्यात अजून लाभक्षेत्रात उजनीचे पाणी पोहोचविण्यास जलसंपदा विभाग आणि पाटबंधारे विभाग अपयशी ठरला असतानाच आता अचानकपणे इंदापूर तालुक्यातील केवळ २२ गावासाठी ५ टिमसी इतके पाणी वळविण्याचा निर्णय घेणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण धनवडे यांनी व्यक्त केली आहे.  
                              उजनी धरणाची निर्मीती होत असताना बारमाही पाणी देण्याचे आश्वासन देऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या.दहा वर्षात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून सर्व फाटे,उपफाटे याद्वारे उजनीचे पाणी मिळेल असे आश्वासन देण्यात आले.मात्र आज ४० वर्षातनंतरही सोलापूर जिल्हा उपेक्षित राहिला आहे.निधी उपलब्ध नाही असे सांगत सोलापूर जिल्ह्यातील कामे अपूर्ण ठेवली जात असताना मराठवाडा सिंचन योजनेसाठी उजनीतून २१ टिएमसी पाणी पळविण्यासाठी निधी उपलब्ध केला जात आहे.वास्तविक पाहता उजनीतून मराठवाड्यास पाणी देण्यासाठी कृष्णा नदीचे पाणी उजनीत वळिवणे किंवा उजनी धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाणी देणे हा निकष होता मात्र तो बाजूला सारण्यात आला.अशाच पद्धतीने आता २२ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आदेश काढला असून आम्ही या विरोधात जनआंदोलन उभारू आणि न्यायालयाचे दार ठोठावू असा इशारा लक्ष्मण धनवडे यांनी दिला आहे.              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *