ताज्याघडामोडी

शिवसेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ

बुलडाणा, 19 एप्रिल : कोरोना काळात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं राजकारण तापलं असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड सध्या चर्चेत आले आहेत. कारण आमदार गायकवाड यांनी नुकतीच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना जंतू कोंबण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून भाजपच्या एका माजी मंत्र्यासाठी चक्क शिवराळ भाषा वापरली आहे.

शिवसेना आमदार गायकवाड यांनी एक व्हिडिओ जारी करत भाजप नेते संजय कुटे यांच्यासह बुलडाण्यातील इतर भाजप नेत्यांवर जहरी टीका केली आहे. या व्हिडिओत त्यांनी अनेक असंसदीय शब्दांचाही वापर केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच जर अशा भाषेचा वापर करत असतील तर कायदा-सुव्यस्थेचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय म्हणाले होते संजय गायकवाड?

“तुमच्या सरकारमुळं लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

दरम्यान, या सगळ्या वादग्रस्त विधानांप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काही कारवाई करणार का किंवा त्यांना समज देणार का, हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *