ताज्याघडामोडी

नामनिर्देशन पत्र दाखल करताना दोनच व्यक्तींना प्रवेश

   पंढरपूर, दि. 21:-  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी 11.00 ते दुपारी 3.00  वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र  नमुना 2 ब मध्ये दाखल करावे.  तसेच  त्यासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्र  नमुना 2 ब  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून, एका उमेदवारास जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 173 (अ) अन्वये उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपुर्वी शपथ घेणे आवश्यक आहे.  उमेदवार अन्य मतदार संघातील असल्यास त्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक सूचक तसेच इतर उमेदवारांना 10 सूचक याच मतदार संघातील असणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवारास पक्षाचा मूळ ‘ अ’ व  ‘ब’ फॉर्म, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपुर्वी दाखल करणे बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 हजार तर अनुसूचित जाती-जमातीसाठी  पाच हजार रुपये अनामत रक्कम रोखीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे अथवा कोषागारामध्ये भरुन पावती जोडावी.  निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, यासाठी उमेदवाराने बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे. सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत देणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नजिकच्या काळातील  2 सेंमी ते 2.5 सेंमी स्पष्ट व पुर्ण चेहरा दिसेल अशा पध्दतीने फोटो सादर करावा.

उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्रासोबत  नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र रुपये 100 च्या स्टँपवर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांची संपत्ती, मत्ता व दायित्व, शैक्षणिक व गुन्हेगारीविषयी माहिती देणे आवश्यक आहे. उमेदवारावरील दाखल गुन्ह्यांची माहिती  उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्द करावी. मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांनी गुन्हेगारीबाबत माहिती पक्षाला कळविले असल्याबाबतचे  घोषणपत्र प्रतिज्ञापत्र नमुना 26 मध्ये करणे आवश्यक आहे.

भारत निवडणुक आयोगाने  वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे व सुचनांचे पालन उमेदवारांनी करावे , असे आवाहनही निवडणुक निर्णय अधिकारी गुरव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *