Uncategorized

महावितरणच्या वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली

करोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. आजही महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे विजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी उपस्थित होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय एकाही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी प्रताप जाधव म्हणाले, येथील नागरिक, व्यावसायिक, शेतकरी लॉकडाऊन तसेच अवकाळीच्या संकटातून सावरत असतानाच महावितरणने थकीत वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता अरेरावीची भाषा वापरात वीज तोडणीचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुद्दत तरी द्यावी. तसेच, गोरगरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीची भाषा वापर करू नये. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न करता, तसेच पूर्वकल्पना न देता अरेरावीची भाषा वापरात एका जरी ग्राहकांची वीज तोडणी केली तर शिवसेना याचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *