

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, सहप्रभारी सोनल पटेल, जिल्हा प्रभारी मोहन जोशी, सहप्रभारी चेतन चव्हाण यांच्या मान्यतेने पंढरपूर येथील बजरंग संभाजी बागल व सुहास दत्तात्रय भाळवणकर यांची सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सन 1978 साली कॉंग्रेस आयच्या स्थापनेपासून पंढरपुरात बजरंग बागल व सुहास भाळवणकर हे आजतागायत कॉंग्रेस पक्षाचे जोमाने व एकनिष्ठेने काम करीत आहेत. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये पक्षवाढीसाठी त्यांच्या नियुक्तीमुळे मदत होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे कॉंग्रेस श्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्त्यास न्याय दिल्यामुळे सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
बजरंग बागल हे दाजी या नावाने ओळखले जातात. एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने त्यांना 1978 साली इंदिरा कॉंग्रेसच्या पंढरपूर विधानसभेची उमेदवारी दिलेली होती. व त्यानंतरही 1999 साली कॉंग्रेसच्यावतीने पुन्हा एकदा त्यांना विधानसभेची उमेदवारी देवून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आलेली होती. विशेष म्हणजे श्रीमती सोनिया गांधी यांची पहिली सभा पंढरपुरात झाली होती. अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे.
तसेच सुहास भाळवणकर यांनी यापूर्वी पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून 5 वर्षे काम केलेले असून कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविण्याचे काम केलेले आहे. विशेष म्हणजे भाळवणकर यांचे बंधू कै.रघुनाथ व कै.बाळासाहेब या दोन्ही बंधूंनीदेखील कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे अशा दोन्ही कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाने सक्रीय केल्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.









