गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

तक्रारदार यांना फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक (वय 47, रा. प्लॉट नं. 16, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवाडी, वाई) यास येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी 4 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड व तो न दिल्यास 2 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

लाचखोरीचे हे प्रकरण 2014 सालचे आहे. तक्रारदार यांनी मौजे कोंडवे (ता. सातारा) येथील फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे लिपिक कृष्णात मुळीक यांनी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची बदली वाई भूमिअभिलेख कार्यालय, मोजणी खाते, वर्ग 3 येथे झाली असल्याचे सांगितले तसेच नकाशाची नक्कल हवी असल्यास वाई येथे येऊन पैसे देऊन जाण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन भूमिअभिलेख कार्यालय, वाई येथील कृष्णात मुळीक या लिपिकाविरुद्ध तक्रार दिली. त्यावेळी तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीहरी पाटील यांना भेटून तक्रारअर्ज दिला. या विभागाने तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांना तपासाचे आदेश दिले.

दरम्यान, तडजोडीअंती 10 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम 1 सप्टेंबर 2014 रोजी वाई-सातारा रोडवरील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे मारुती अल्टोमध्ये बसून त्याने स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरोधात वाई पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला.

या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी केला. जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बचाव व सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. लक्ष्मणराव खाडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी मुळीक याला शिक्षा ठोठावली. दरम्यान, प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे सहायक फौजदार विजय काटवटे यांनी त्यांना सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *