ताज्याघडामोडी

लॉकडाऊनच्या दिशेने पुढचे पाऊल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण आदेश

शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत पुण्यातील २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक झाली. यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रिव्ह्यू घेऊन शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय होईल. लग्न समारंभासाठी केवळ २०० जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. हॉटेल्स ११ वाजेपर्यंत सुरू त्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच रात्री ११ ते सकाळी सहा संचार बंदी लागू करण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण अमलात आणण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन अजित पवारांनी बैठकीत केले आहे.

या बैठकीस कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पशुसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *