ताज्याघडामोडी

2 कोटी रुपये गाडीच्या बोनेटमध्ये ठेवून सुरू होता प्रवास, इंजिनने घेतला पेट

सिवनी, 02 फेब्रुवारी: सिवनी-नागपूर महामार्गावर रविवारी रात्री एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील काही लोकांनी एका कारमधून जळलेल्या 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडत असल्याचं पाहिलं. कारमधील लोकांनी बोनेट उघडून पाहिलं, तर सुसाट वाऱ्यामुळे 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावरच उडायला लागल्या.  हे दृश्य पाहून गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

या प्रकरणात सिवनी जिल्हा पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या तीन आरोपींकडून 1.74 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवळपास 2 कोटी रुपयांच्या नोटा घेऊन जात होते. त्यांनी या सर्व नोटा गाडीच्या बोनेटमध्ये लपवल्या होत्या. पण गाडीच्या इंजिनला आग लागल्याने काही नोटा जळाल्या तर काही नोटा रस्त्यावर उडून गेल्या. हा सर्व पैसा वाराणसीतील एका सोनं चांदीच्या व्यापाऱ्याचा आहे.

हा सर्व पैसा सोनं खरेदी करण्यासाठी वाराणसीतून मुंबईला आणला जात होता. सोनं खरेदी करून याच मार्गाने पून्हा वाराणसीला जाण्याचा प्लॅन या आरोपींचा होता. हा सर्व पैसा टॅक्सचोरीतून मिळवला असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे तिन्हीही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते मात्र पोलिसांनी तातडीने पाऊलं उचलल्याने तिघांनाही अटक करण्यात यश आलं आहे.

यावेळी जप्त केलेली इनोव्हा गाडी मुंबई येथे रजिस्ट्रेशन केलेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघंही आरोपी उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. सुनिल आणि न्यास हे दोन आरोपी उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील आहेत. तर हरिओम हा आरोपी आझमगड याठिकाणचा आहे. पोलिसांनी यांच्याकडून 1.74 करोडच्या 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *