ताज्याघडामोडी

श्री सूर्यनारायणदेव मंदिर पंढरपूर येथे योगिनी-अजानवृक्षाचे रोपण

श्री सूर्यनारायणदेव मंदिर पंढरपूर येथे योगिनी-अजानवृक्षाचे रोपण

            बायोस्फिअर्स, श्री सूर्यनारायणदेव मंदिर ट्रस्ट, नारायण चिंचोली, ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१, श्री सूर्यनारायणदेव यात्रेचे औचित्य साधून मंदिरात योगिनी-अजानवृक्षाचे सूर्यनारायणासमवेत विधिवत पूजन करून मंदिर परिसरात पंढरपूर तालुक्याचे प्रांत श्री. सचिन ढोले व मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. सदर अजानवृक्षाचे रोप हे आळंदीयेथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे, जणू त्याचीच प्रतिकृती. या कार्यक्रमाप्रसंगी श्री सूर्यनारायणदेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. गहिनीनाथ नारायण चव्हाण; श्री. सुभाष महादेव हिंगमिरे; मंदिराचे पुजारी श्री. गणेश वासुदेव आवताडे;  बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर; सन्माननीय स्थानिक ग्रामस्थ श्री. धनाजी मछिंद्र म्हस्के; श्री. नाथबाबा दामू बनसोडे; श्री. महादेव हरिभाऊ वसेकर; श्री. दिलीप शिंदे; श्री. दत्तात्रय औदुंबर म्हस्के; श्री. कुमार त्रिंबक नलवडे; श्री. सुभाष नारायण म्हस्के; श्री. लक्ष्मण गोरख धनवडे; श्री. बाळासाहेब कोंडीबा सुरवसे; श्री. शाहू सावंत; मंदिर समितीचे सदस्य व भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच या पर्यावरणीय व धार्मिक दृष्टीकोनातून या अतंत्य महत्वाच्या वृक्षाच्या बाबतीत डॉ. सचिन पुणेकर लिखित सचित्र माहिती असलेल्या हरित पत्रिकेचे अर्पण आणि उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी जैविक आक्रमणाविरोधी “मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि)” या हरित चळवळी बाबतच्या माबि प्रतिज्ञेचे सांघिक वाचन केले आणि उपद्रवी परदेशी जैविक घटकांना भारतातून समूळ उच्चाटन करण्याचा दृढ-संकल्प देखील केला. दरवर्षी पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी श्री सूर्यनारायणदेव पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहाने साजरे होते. पालखी सोहळ्यातील भाविकांनी या हरित उपक्रमात या ज्ञानवृक्षाबाबत तसेच माबि या हरित चळवळीविषयी जाणून घेतले आणि या चळवळीत सक्रीय पाठींबा दर्शविला. तसेच श्री सूर्यनारायणदेवाच्या पालखी सोहळ्यापूर्वी पाद्य पूजनासाठी हरिद्वार येथील गंगाजल आणि महाराष्ट्रातील विविध पवित्र कुंडातील (सिद्धबेट-आळंदी; कुबेर कुंड; श्री वृद्धेश्वर मंदिर, सूर्य कुंड; आपेश्वर कुंड, मढी) संकलित केलेले जल हे वापरण्यात आले.           

            बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री. संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीवर असलेला ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे होय. संत साहित्याचा अभ्यास केला असता नाथ संप्रदाय व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता तो देखील याच सिद्धबेटातील अजानवृक्षाचा होता. यावरून माऊलींची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे. गेली सात शतके हा ज्ञानवृक्ष जनसामान्यांना व अभ्यासकांना प्रेरित करीत आहे, आत्मशक्ती देत आहे. तसेच नाथ संप्रदयात ह्या देव-वृक्षाला विशेष महत्व दिले आहे. गोरक्षवल्ली, योगवल्ली, योगिनी, शांभवी, अजानवृक्ष, अजानु, निधी, पूर्णधन अश्या अनेक नावांनी हा वृक्ष सुपरिचित आहे. एकुणातच काय या औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ज्ञानवृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वृक्षाबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी. तसेच या ज्ञानवृक्षाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जनमानसात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष आता सर्वदूर करीत आहोत. आजपर्यंत या हरित चळवळीच्या माध्यमातून भारतातील-महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, विद्यापीठे, शैक्षणिक, व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *