कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील बनासवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेवर तिच्या पतीनं दिवसाढवळ्या चाकूनं वार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. २१ जूनला दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.
महिला (निकिता), तिचा पती दिवाकर आणि त्याचा मित्र प्रदिपसोबत दुचाकीवरुन जात होते. प्रदिप दुचाकी चालवत होता. त्यानं जाणूनबुजून निकिताला खाली पाडलं. यानंतर तिच्या पतीनं चाकूनं वार करण्यास सुरुवात केली. दिवाकरनं निकितावर चाकूनं सपासप वार केले. यावेळी घटनास्थळी एक जण उपस्थित होता. तो दुचाकीवरुन घडत असलेला प्रकार पाहत होता. काही वेळानं तो घटनास्थळावरुन निघून गेला.
स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर बनासवाडी पोलीस अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. महिलेची प्रकृती गंभीर आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तपास सुरू केला आहे.