ताज्याघडामोडी

अनुदानित ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेमार्फत अदा होणार !

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ग्रंथालयांच्या नावावर जमा होते. संस्थेचे पैसे संस्थेला मिळाले पाहिजेत व कर्मचाऱ्यांचे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने झाले तर त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांना शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथालय ओळखपत्र देण्याच्या सूचनाही यावेळी उदय सामंत यांनी दिल्या.

वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी व ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरते ग्रंथालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *