ताज्याघडामोडी

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोव्हिड-19 लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली.

पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नाही.16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली. लस देशभरात वितरीत केली जाणार आहे. लस कोणत्या राज्यांना पाठवण्यात आली याबाबत सिरमकडूनच माहिती मिळू शकेल. पोलिसांनी लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना एअरपोर्टपर्यंत सुरक्षा देण्याचं काम केलं.”

भारतात पहिल्या टप्प्यात कोव्हिड वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे. देशभरातील कोरोनाविरोधी लढ्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाईल.मंगळवारी सकाळपासूनच सीरम इन्स्टिट्युटमध्ये लशीचे बॉक्स ट्रकमध्ये भरण्याचं काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लस घेऊन जाणाऱ्या ट्रकना आतून सॅनिटाईज करण्यात आलं आहे.

लसीकरण मोहीम योग्य पार पाडली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.सामान्यांना एवढ्यात कोरोनाविरोधी लस मिळणार नाही. आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यास लसीकरण केलं जाणार आहे. त्यात 30 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *