ताज्याघडामोडी

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी 100.19 हेक्टर क्षेत्र संपादित  -प्रांताधिकारी-सचिन ढोले

              पंढरपूर, दि. 31 :  मोहोळ ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965)  पंढरपूर उपविभागातील  पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील   19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर संपादित करण्यात आले  असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

             पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांकडून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965)  चौपदरीकराणासाठी 160.42 हेक्टर क्षेत्र संपादित करावयाचे असून त्यापैकी 100.19 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील 13 गांवे तर मोहोळ तालुक्यातील 6 गावे अशा एकूण 19 गावांचा समावेश आहे. या महामार्गावरील 85 टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना लवकरच भुसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

               संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965) चौपदरीकरणाचे काम  गतीने सुरु असून, भीमा नदीवरील पंढरपूरला जोडणाऱ्या गुरसाळे – कौठाळी पुलाचे भूमिपूजन प्रांताधिकारी  ढोले यांच्या हस्ते आज गुरुवार दि.31 डिसेंबर रोजी संपन्न झाले. 

                मोहोळ – पंढरपूर – पुणे – आळंदी हा राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी  गुरसाळे – कौठाळी या दरम्यान हा नवीन पूल उभा राहतो आहे. या पुलाची रुंदी ( 32 मीटर्स ) तर लांबी  525 मीटर्स इतकी आहे. महापुरामुळे पंढरपूरशी अनेक गावांचा संपर्क तुटतो. तसेच अहमदनगर, मराठवाडा, विदर्भात पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांचाही संपर्क तुटत असतो पुलाची उंची व रुंदी जास्त असल्याने वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरु राहील. वारी कालावधीत वाहतुक नियंत्रणासाठी  या पुलाचा वापर होईल. 

महामार्गावरील पुलामुळे वाखरी गुरसाळे, आढीव, देगांवआदी गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. संबधित गावे पंढरपूर शहराशी जोडल्याने  विकासाला चालना मिळणार आहे.  तसेच याभागात साखर कारखाने असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गासाठी पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील  19 गावातील प्रकल्पग्रस्तांनी व नागरिकांनी योग्य सहकार्य केल्याने महामार्गाचे काम गतीने सुरु असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *