ताज्याघडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची  पंढरपूरला पथकाकडून पाहणी

              पंढरपूर, दि. 22 :  तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. तसेच घरे, शेतजमीन, रस्ते, महावितरण, जलसंपदा आदी शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची प्रत्यक्ष भेट देवून केंद्रीय पथकाने पाहणी केली.

              पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव, सुरवसे वस्ती (भंडीशेगांव) , उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पुल, वीज वितरण  आदी  शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी  ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यश पाल व  मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी)  तुषार व्यास यांनी  पाहणी  केली.

               यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार विवेक साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा कृषि अधिक्षक रवींद्र माने, जिल्हा उपनिंबधक कुंदन भोळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गटविकास अधिकारी  रविकिरण घोडके,  कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                 केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जावून पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. भंडीशेगांव येथील शेतकरी विठ्ठल यलमार यांनी पिक नुकसानीची  माहिती दिली तर मोहन आप्पा कवडे यांनी घरात पाणी आल्याने झालेली पडझड व पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे याबाबत माहिती दिली तसेच सुनिल सुरवसे यांनी पुरामुळे शेतजमिनीसह डाळींब पिक वाहून गेले असल्याचे सांगितले तसेच केंद्र शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. उपरी येथील शेतकरी शहाजी गव्हाणे यांच्या ऊस पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी उपरी ग्रामस्थांनी पुरामुळे वाहुन गेलेल्या पुलाचे काम तात्काळ करावे अशी मागणी केली.  तर टाकळी येथील महादेव काशीद व लालासो देशमुख यांचे अतिवष्टीने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी संबधित शेतकऱ्यांनी तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केंद्रीय पथकाकडे केली.

                   यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी  तालुक्यातील अतिवष्टीमुळे व पुरामुळे 69 हजार 500 शेतकऱ्यांचे 65 हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका बाजरी, भुईमुग, ज्वारी, कांदा, सोयाबीन, फळबाग, घरांची पडझड, आदींचे नुकसान झाले तसेच रस्ते,पुल, वीज, बंधारे या सार्वजनिकमालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे यावेळी केद्रीय पथकाला सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *