ताज्याघडामोडी

सत्यशोधक चळवळीतून कर्मवीरांना रयतच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली- प्रा. अजित पाटील

सत्यशोधक चळवळीतून कर्मवीरांना रयतच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली- प्रा. अजित पाटील
रयत विद्यापीठाच्या निर्मितीचे कर्मवीरांचे स्वप्न लवकरच साकार होणार- संजीव पाटील

पंढरपूर – “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात
त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा होता. कर्मवीरानी रयत
शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले. महात्मा जोतीराव फुले
यांच्या सत्यशोधक चळवळीत काम करताना त्यांना शैक्षणिक संस्था उभी
करण्याची प्रेरणा मिळाली. सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस, चिकाटी, तळमळ,
कष्ट सोसण्याची तयारी या बळावर त्यांनी बहुजन समाजाची सोय केली. महात्मा
गांधी यांनी कर्मवीरांच्या कार्याचे कौतुक केले.” असे प्रतिपादन थोर
विनोदी मराठी साहित्यिक प्रा. अजित पाटील यांनी केले.
        रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय
व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीरांच्या १३३
व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक व रयतच्या मध्यविभागीय
सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील हे होते.
        प्रा. अजित पाटील पुढे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्वभाव
हा बंडखोर होता. त्यांनी सत्य व प्रामाणिकपणा यांच्याशी कधीही तडजोड केली
नाही. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या संकटात  त्यांनी हार मानली
नाही. केवळ सहावी नापास असलेल्या अण्णांना आयुष्यात डी.लिट. ही मानद पदवी
शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल मिळाली.”
        अध्यक्षीय भाषणात संजीव पाटील म्हणाले की, “कर्मवीर अण्णांनी ज्या
प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयतची निर्मिती केली. तशीच परिस्थिती सध्या
कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील
ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी
रयत प्रयत्न करत आहे. रयत विद्यापीठ करण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी
स्वप्न पहिले होते. ते स्वप्न लवकरच सत्यात उतरत आहे. ‘कमवा व शिका’ हा
नारा देवून कर्मवीरांनी बहुजन समाज शिकविला. मात्र सध्या ‘शिका आणि कमवा’
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.
कोव्हीड १९ चे आव्हान स्वीकारून शिक्षकांनी शिक्षण अखंडितपणे
विद्यार्थ्यान पर्यत पोहोचवावे.”
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक
शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. राजाराम राठोड
यांनी करून दिला. हा कार्यक्रम झूमद्वारे ऑनलाईन घेण्यात आला. या
कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शिवाजीराव पाटील
रोपळेकर, डॉ. राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक संजय शेवाळे, महाविद्यालय
विकास समितीचे सदस्य सुभाषआबा सोनवणे, अमरजीत पाटील, उपप्राचार्य डॉ.
निंबराज तंटक, डॉ. लतिका बागल, प्रा. चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता डॉ.
तानाजी लोखंडे, कार्यालय प्रमुख अनंता जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य डॉ. रमेश शिंदे, डॉ. समाधान माने व
प्रा. राजेंद्र मोरे यांनी केले. या कार्यक्रमात सिनिअर, ज्युनिअर,
व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व
विद्यार्थिनी यु-ट्यूबच्या माध्यमातून सहभागी झाले. शेवटी उपस्थितांचे
आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *