विवाहित महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर आपला पती हा महिलेला अडथळा वाटू लागला होता. त्याला संपवण्याचा प्लॅन दोघांनी मिळून आखला. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघांना लग्न करून सुखाचा संसार करता येईल, असा विचार करून पतीच्या हत्येचा कट पत्नीनं रचला आणि पतीची हत्या केली.
पतीला होता संशय
मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणाऱ्या धनराज मीणा यांचं पत्नी संगीतासोबत लग्न झालं होतं. त्यांना एका मुलगा आणि एक मुलगी होती. मीणा यांच्याशेजारी आशीष पांडेय नावाचा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर राहत होता. शेजारी असल्यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं होतं आणि त्यांची एकमेकांसोबत मैत्रीही झाली होती. अनेकदा धनराज घरी नसतानादेखील आशीष त्यांच्या घरी येत असे आणि त्याबद्दल धनराज यांना कुठलाही आक्षेप नसायचा. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी आशीष आणि पत्नी संगीता यांना संशयास्पद अवस्थेत एकत्र पाहिलं आणि तेव्हापासून त्यांचा संशय़ बळावला होता.
काटा काढण्याचा निर्णय
त्या दिवसानंतर धनराज यांनी आशिष यांच्यासोबत बातचित बंद केली होती. त्यांची आणि संगीताची वारंवार या विषयावरून भांडणं होत होती. त्यामुळे दोघांनी मिळून धनराज यांचा खून करण्याचा डाव आखला. त्यासाठी आशिषने संगीताला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. घटनेच्या दिवशी संगीताने काढा करून त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. कोरोनापासून संरक्षणासाठी हा काढा केल्याचं सांगत तिने धनराज यांना तो काढा दिला. काढा प्यायल्यावर गाढ झोपलेल्या धनराज यांना संगीता आणि आशिष यांनी हातोडा आणि काठ्यांनी वार करत ठार केलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह गाडीत घालून ते शहराबाहेर दिवसभर फिरत राहिले.
पोलीस ठाण्यात कबुली
मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्यामुळे अखेर त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्या गुन्ह्याची कबुल दिली. दोघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.