क्वाटरचा डबल रेट तरीही मिळतेय डुप्लिकेट !
अवैध दारू विक्रेत्यांचा रग्गड नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ
उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केला आणि देशासह केवळ जीवनावश्यक किरणा वस्तू व कृषी संबंधित वस्तूची दुकाने वगळता सारे काही व्यवसाय बंद झाले.याच कारणामुळे वाईन शॉप आणि परमिट रूमही बंद झाल्याने महाराष्ट्राला प्रतिवर्षी जवळपास १६ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ आपल्या ”गुप्त जीवनावश्यक” वस्तूच्या माधयमातून भेट देणाऱ्या वर्गाची मात्र मोठी गोची झाल्याचे दिसून येते.वर्षातील आठ-दहा ड्राय डे च्या दिवशी हक्काने पण जास्त दरात सोय करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांनी मात्र सुरवातीच्या काही दिवसात प्रामाणिक नफेखोरी केल्यानंतर आता थेट लोकांच्या जीवाशी खेळ सुरु केला आहे. गेल्या २५ दिवसाच्या कालावधीत पंढरपूर पोलीस उपविभागांतर्गत पंढरपूर शहर,पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे व करकंब पोलीस ठाणे यांनीं अवैध दारू विक्रीवर केलेल्या कारवाईचा आकडा फार मोठा आहे.असे असताना देखील पंढरपूर शहर व तालुक्यात काही अवैध दारू विक्रेते हे दुप्पट दर घेऊनही डुप्लिकेट दारू विदेशी बनावटीची देशी दारू विक्री करीत असल्याची जोरदार चर्चा सध्या होताना दिसून येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने याच कालावधीत केलेल्या कारवाईत मानवी शरीरास घातक असलेल्या रसायनांचा वापर करून नामांकित ब्रॅण्डची बनावट दारू बनविणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.मात्र पंढरपूर उत्पादन शुल्क विभाग मात्र या बाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याचे निर्दशनास येत आहे.कारवाई बाबत विचारणा केली असता उत्पादन शुल्क विभागाकडून मनुष्यबळ कमी असल्याचे व आपत्ती व्यवस्थापन काळात पोलिसांनाही हि जबाबदारी पार पाडावी लागते असे सांगितले जात असले तरी निदान पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेली विदेशी दारू बनावट तर नाहीना याची खातरजमा करण्यासाठी व लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी तरी उत्पादन शुल्क विभागाने पुढे यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.