ताज्याघडामोडी

जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ?

जॅमर भेट देऊन नगर पालिका प्रशासन जबाबदारी झटकणार ?

नगर पालिकेने असहकार्य केल्यास शहर वाहतूक शाखेने जॅमरचे ‘दान’ नाकारावे ! 

धर्मशाळा, लॉज,शॉपिंग सेंटर, मंगल कार्यालये यांचे पार्किंग स्पेस कोण खुले करणार ?

पंढरपूर शहरात जागोजागी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी या उद्देशाने पंढरपूर नगर पालिकेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेस नुकतेच ५० जॅमर भेट दिले आहेत.मात्र पंढरपूर शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीची जबाबदारी नगर पालिका केव्हा स्वीकारणार आहे अशीच चर्चा आता होत असून पंढरपूर शहर वाहतूक शाखेने या जॅमरचा सुयोग्य वापर केल्यास खऱ्या अर्थाने नगर पालिका प्रशासनाचा हलगर्जीपण उघडा पडणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

       तीन वर्षांपूर्वी पंढरपूर नगर पालिका,पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या एक वाहतूक आराखडा बनविला होता.त्या आराखड्याची अमलबजावणी झाली का नाही हे अजून गुलदस्त्यात असले तरी संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग हा नो पार्किग झोन ठरविण्यात आला होता तर शहरातील वीर सावरकर पथ (स्टेशन रोड) सह इतरही काही प्रमुख रस्ते नो पार्किंग झोन म्हणून निश्चित करण्यात आले होते.मात्र आजही प्रदक्षिणा रस्त्यासह अनेक रस्त्याबर नो पार्किग झोन असतानाही यात्रा कालावधीत तसेच एरव्हीही चारचाकी वाहने व दुचाकी वाहने बिनधास्त पार्क केलेली आढळून येतात.यात खऱ्या अर्थाने अडथळा ठरतो आणि वाहतूक शाखेच्या कारवाईसही सामोरे जावे लागते ते चार चाकी वाहनांना. अर्थात शहरातील नागरिकांच्या स्वमालकीच्या चार चाकी वाहनांवर कारवाई होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असून सर्वात जास्त कारवाईचा फटका सहन करावा लागतो तो भाविकांच्या वाहनांना.   

  सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा पदभार विरेश प्रभू यांच्याकडे होता त्यावेळी पंढरपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेबाबत येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगोपांग चर्चा झाली होती.पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग आणि नदीकाठच्या परिसरात यात्रा कालावधीत पायी चालणाऱ्या भाविकांना सर्वात जास्त त्रास होतो तो विविध मठ,धर्मशाळा,लॉज आणि मंदिरे या मध्ये निवासासाठी राहिलेल्या भाविकांच्या चार चाकी वाहनांचा.पंढरपूर नगर पालिकेने या गंभीर बाबीची दखल घेऊन अशा मठ,धर्मशाळा आणि लॉजचे पार्किंगस्पेस तातडीने रिकामे करावेत व त्याचा पार्किगसाठीच वापर व्हावा यासाठी पंढरपूर नगर पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशा आशयाचे पात्र त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेबर हुकूम पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी नगर पालिकेस दिले होते मात्र या पत्राला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली होती.  

        माझे माहेर पंढरी या अभंगावर श्रद्धा बाळगत सावळ्या विठ्ठलाच्या दारी भाविक भक्त यात्रा कालावधीच नव्हे तर वर्षभर दरदिवशी हजारोंच्या संख्येने येत असतात.मात्र या शहरात प्रवेश करतानाच कुठलाही ड्रेस कोड नसलेले पार्किंग फी वसुलीच्या ठेकेदाराचे अभिकर्ते गाडीत आत डोकावत पावती फाडा असे दर्डांवताना दिसून येतात.गळ्यातील नगर पालिका प्रशासनाच्या शिक्क्याचे ओळखपत्र आणि हातात पावती पुस्तक पाहून येथे चारचाकी वाहन घेऊन येणाऱ्या भाविकांचा इलाज खुंटतो आणि ते गपगुमान पार्किंग फीची पावती फाडून शहरात प्रवेश करतात.ज्या मठात,धर्मशाळेत लॉजवर मुक्काम करायचा आहे त्या परिसरात वाहने लावतात आणि आपण पार्किंग फीची पावती फाडली आहे असे समजून बिनधास्त देवदर्शनाला जातात परत आल्यानंतर आपल्या वाहनांना जॅमर लावलेला दिसून येतो आणि हे भाविक पुरते गडबडून जातात. वादाचे प्रसंग उभे राहतात.आपल्या भागातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांना फोन लावतात आपल्याकडे पार्किग फी ची पावती असल्याचे ठणकावून सांगतात मात्र पुढे त्यांचा अनेकवेळा नाईलाज होतो आणि नाईलाजास्तव दंड भरून पुढील प्रवासासाठी निघूनही जातात.याच वेळी ज्यांनी आपल्याकडून पार्किग फी वसूल केली त्याचा शोधही ते अनेक वेळा घेतात मात्र त्यांना असहकार्य केले जाते, हात झटकले जातात हा कटू अनुभव आहे.  

       एकीकडे भाविकांना तासन्तास दर्शन बारीत थांबावे लागू नये म्हणून पाच-पन्नास रुपये फी आकारून सशुल्क दर्शनाचा निर्णय घ्येण्यास काही पुढारी वारकरी नेते विरोध करतात मात्र त्याच वेळी या शहरात आलेल्या भाविकांना पार्किग फी आणि वरून वाहतूक शाखेचा दंड या दोन्हीचा भुर्दंड सहन करावा लागतो या बाबत हेच वारकरी पुढारी कधीही नगर पालिकेस अथवा वाहतूक शाखेस जाब विचारण्याचे धाडस करीत नाहीत. 

  पंढरपुर शहरात दरदिवशी भाविकांचे किमान दोनशे चारचाकी दाखल होतात त्यांची पार्किंग फीची पावतीही फाडली जाते मात्र एकदा पावती फाडली कि नगर पालिका प्रशासनाची जबाबदारी संपुष्ठात येते.शहरात गजानन महाराज मठानजीक दोन पार्किंग स्पेस असून अंबाबाई पटांगण हा तिसरा महत्वाचा पार्किंग स्पेस आहे आणि या ठिकाणी ना कुठलेही सुरक्षा रक्षक तैनात असतात ना सीसीटीव्ही कमरे लावलेले आहेत.तर अंबाबाई पटांगण तर अतिक्रमण आणि अस्वछता याच्या विळख्यात सापडले आहे.तर अनेक मठ,धर्मशाळा.लॉज यांनी आपले पार्किंग स्पेस बंदिस्त केले असून या ठिकाणी भाविकांच्या वाहनांना वाहने पार्क करणे अश्यक्य बनले आहे. 

    त्यामुळेच नगर पालिका प्रशासनास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावीं याची खरेच काळजी असेल तर विविध मठ,मंदिरे,लॉज,नगर पालिकांच्या आणि खाजगी मालकीचे शॉपिंग सेंटर याना बांधकाम परवाने देताना नकाशात नमूद केलेले पार्किंग स्पेस आधी खुले करावेत मगच जॅमर भेट देण्याचे औदार्य दाखवावे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *