ऑक्टोबर महिना रविवारी (३१ ऑक्टोबर) संपत आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. १ तारखेपासून काही गोष्टींमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊया. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर किमान १०० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
१ नोव्हेंबरपासून बँकांमध्ये पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. तसेच रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहे. याशिवाय गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठा बदल होणार आहे.
१. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर महागणार
१ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्येना पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. एलपीजीच्या विक्रीतील तोटा पाहता कंपन्यांकडून प्रती सिलिंडर १०० रुपयांपर्यंत किंमत वाढवली जाऊ शकते.
२. बँकिंग नियमांमध्ये बदल
आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून निर्धारीत मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल. १ नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी १५० रुपये भरावे लागणार आहेत. खातेधारकांसाठी तिप्पट ठेवी जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, पण ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केल्यास त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला असून, त्यांना डिपॉझिटवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, पण पैसे काढल्यावर १०० रुपये द्यावे लागतील.
३. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलणार
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. याआधी १ ऑक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार होता, मात्र काही कारणांमुळे ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. यानंतर, १३ हजार पॅसेंजर गाड्या आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळा बदलतील. देशात धावणाऱ्या सुमारे ३० राजधानी गाड्यांच्या वेळाही १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.
४. गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी
१ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो, तेव्हा तुम्हाला हा ओटीपी (OTP) डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. हा कोड सिस्टीमशी जुळल्यानंतरच ग्राहकाला सिलिंडर मिळणार आहे.
५. Whatsapp बंद होणार
काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर १ नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार आहे. १ नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म अँड्रॉइड (Android 4.0.3), Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.