ताज्याघडामोडी

शिवसेनेचे संजय कोकाटे यांना ठाकरे सरकारचा दणका

शिवसेनेचे संजय कोकाटे यांना ठाकरे सरकारचा दणका

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावरील तज्ञ संचालकपद केले रद्द 

गेल्या अनेक वर्षांपासून माढा तालुक्याच्या राजकारणात आ.बबनराव शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले गेलेले व माढा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष तथा ऐन विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करून या मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणूंन निवडणूक लढविलेले संजय कोकाटे यांची विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावरील  तज्ञ संचालक म्हणून झालेली नियुक्त ठाकरे सरकारने रद्द केली आहे.या निर्णयामुळे माढा तालुक्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली असल्याचे दिसून येते. 
       माढा तालुक्याच्या राजकारणात गेलेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदे यांना आमदार होण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे विरोधक पक्षभेद बाजूला सारत अनेकवेळा एकत्र आल्याचे दिसून येते.यात वाकावच्या सावंत परिवाराने सर्वात जास्त पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आ.शिंदे विरोधात माढा तालुक्यात स्वाभिमानी आघाडीच्या छत्राखाली विरोधक एकवटले खरे पण त्यांना एकही जि.प. जागेवर विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत आ. बबनराव शिंदे यांचे २५ वर्षे कट्टर समर्थक राहिलेले अनेक दिग्गज या निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढले होते.   
  भाजपाचे तत्कालीन तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांची फडणवीस सरकारने गतवर्षी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी नियुक्ती केली होती.या नियुक्ती नंतर संजय कोकाटे यांनी या कारखान्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अनेक तक्रारी शासन दरबारी केल्या होत्या,साखर आयुक्तांकडे केल्या होत्या. तर अनेकवेळा कारखान्याच्या व्यवस्थापना विरोधात कारखान्याच्या गेटवर आंदोलनेही केली होती.अर्थात त्यांच्या या आंदोलनास विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा फारसा पाठींबा मिळाला नव्हता. तर साखर कारखाना प्रशासन संचालक नेमणूकीच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. त्यामूळे कोकाटे यांना सभेसाठी उपस्थित राहू दिले नव्हते. या घटनेचा निषेध म्हणून संजय कोकाटे यांनी सभा संपेपर्यंत कारखान्याच्या गेटवर जमिनीवर बसून ठिय्या मांडला होता. यावेळी कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 मध्ये सुधारणा झाल्याने शासनाचे भागभांडवल असणार्‍या संस्थांच्या संचालक मंडळावर शासननियुक्त प्रतिनिधी नेमण्यात येतो.माढ्यात आ. बबनदादा आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचा एकछत्री अंमल आहे. त्यावेळी संजय कोकाटे हे  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
     मात्र १०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी पाच वेळा आमदार राहिलेले व तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले आ.बबनराव शिंदे यांच्या विरोधात कोण लढणार याची चर्चा अगदी उमेदवारी अर्ज  भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत होत असताना व पारंपरिक विरोधी उमेदवार प्रा. शिवाजी सावंत हेच शिवसेनेकडून मैदानात उतरणार असल्याचा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत असतानाच ऐनवेळी संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारीही देण्यात आली. अर्थात या साऱ्या प्रकारामुळे हि उमेदवारी म्यानेज आहे अशी टीकाही होताना दिसून आली.तत्कालीन मंत्री तानाजी सावंत आणि प्रा. शिवाजी सावंत यांच्यासह माढा तालुक्यातील स्वाभिमानी आघाडीचे सारे दिगग्ज एकवटले पण आ. शिंदे यांनी गतवेळेपेक्षा जास्त मताधिक्याने विजय संपादन करीत त्यांना उत्तर दिले होते. 
        विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर आ.बबनराव शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे हे या कारखान्याच्या वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.सर्वाधिक गाळप, सर्वाधिक उतारा,सर्वाधिक वीज निर्मिती, उत्कृष्ट व्यवस्थापन आदी अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार या कारखान्याने पटकावले खरे पण २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रबळ विरोधकांच्या सहकारी संस्थांमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपले समर्थक तज्ज्ञ संचालक म्हणून घुसविण्याचा अजेंडा भाजपा सरकारने राबिवला होता.आणि यातूनच संजय कोकाटे यांची वर्णी लागली होती. 
      आता संजय कोकाटे हे शिवसेनेत आहेत. त्यांनी सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूकही लढविली आहे आणि ते आ. तानाजी सावंत यांचे समर्थक म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहेत पण आ.  तानाजी सावंत हे निवडणुकीनंतर नामदार झाले नाहीत. त्यामुळे ते काही काळ नाराजही होते पण चार दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यामुळे त्यांच्यातील नाराजी दूर झाली असे समजले जात असतानाच आता ठाकरे सरकारने संजय कोकाटे यांची विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावरील तज्ञ संचालकपद रद्द केल्यानंतर आता  आ.तानाजी सावंत व संजय कोकाटे काय प्रतिक्रिया देणार याकडे माढा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
अर्थात ठाकरे सरकारने राज्यातील सर्वच सहकारी साखर करखान्यावरील नियुक्त झालेल्या तज्ञ संचालकांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवसेनेचे संजय कोकाटे यांना दिलासा देण्यासाठी आता नवीन तज्ञ् संचालक नियुक्त करताना पुन्हा संजय कोकाटे यांचा विचार करणार का आणि आमदार तानाजी सावंत हे यासाठी प्रयत्न करणार का याकडेही माढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *