ताज्याघडामोडी

रक्त वाया घालवू नका ! संजय राऊतांचा सल्ला सुशीलकुमार शिंदे समर्थकांना मानवणार ? 

रक्त वाया घालवू नका !

संजय राऊतांचा सल्ला सुशीलकुमार शिंदे समर्थकांना मानवणार ?

रक्ताने पत्र लिह्ण्यापेक्षा रक्ताचे पाणी करून कॉग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार शिंदे समर्थक ?

२४ ऑक्टोम्बर २०१९ रोजी  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि याच दिवसापासून एका नव्या ‘चाणक्याचा’ उदय महाराष्ट्राच्या राजकारणात झाला.अगदी मतदानाच्या तारखेपर्यंत युतीचे गोडवे गायिलेले सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशी घोषणा केली खरी पण या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेची जवळपास दीड महिना झालेली फरफट या राज्यातील जनतेने आपापल्या राजकीय दृष्टीकोनातून पहिली आहे.मात्र गेल्या दोन दिवसापासून संजय राऊत हे पुन्हा आपल्या संपादकाच्या भूमिकेत परत गेले असून त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपातील घोळाबाबत व मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कॉग्रेस मधील नेत्यांवर व त्यांच्या समर्थकांवर अप्रत्यक्ष टीका करू लागले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज त्यांनी सामनातून लिहलेल्या संपादकीयात मात्र जे लोकांच्या मनात तेच आपल्या लेखणीतून कागदावर उतरवले असून यात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील रक्ताच्या शाईच्या लेखणीचाही समाचार घेतला असल्याचे दिसून येते.बारा चा कोटा आणि रक्त वाया घालवू नका, पुढील लढाईसाठी शिल्लक ठेवा हा सोलापूर जिल्ह्यातील शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना दिलेला सल्ला हा नक्की कुठल्या लढाईसाठी दिलेला आहे याचीच खुमासदार चर्चा आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होताना दिसून आली.तर रक्ताने पत्र लिह्ण्यापेक्षा रक्ताचे पाणी करून सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस कसे येतील यासाठी कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कॉग्रेसचे अनेक जेष्ठ समर्थक व्यक्त करीत आहेत.   

              कॉग्रेसमुळेच आंध्रप्रदेशचे राज्यपाल,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,तर राज्याचे जवळपास अडीच दशके मंत्री, केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक सध्या नाराज आहेत.आणि संजय राऊत यांनी आजच्या आपल्या संपादकीयमध्ये कॉग्रेसमुळे सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक पदे भूषविले असल्याचे नमूद केले आहे.अर्थात सुशीलकुमार शिंदे यांनी भूषविलेल्या या पदाचा राज्यातील कॉग्रेसवाढीसाठी नक्की किती फायदा झाला हे राऊत यांनी नमूद केले नसले तरी पुढ्च्या लढाईसाठी रक्त शिल्लक ठेवण्याचा सल्ला हा याच कारणासाठी त्यांनी शिंदे समर्थकांना दिलेला असावा असे वाटते.      

       नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेने आमचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हि भूमिका घेतली.त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याना दिलेल्या वचनाचा संदर्भ देण्यास सुरुवात केली तर संजय राऊत यांनी अमित शहा यांनी ५०- ५० चा फ़ॉर्म्युला मान्य करीत सेनेला मुख्यमंत्रीपद देऊ हे मान्य केले होते याचा दाखला देत महायुतीत बंडाचे निशाण फडकावले होते.आणि केवळ आणि केवळ शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. याचा सर्वात जास्त विसर कॉग्रेसच्या दिल्लीस्थित हायकमांड पासून ते अगदी प्रभावहीन ठरलेल्या राज्याचे नेते म्हणून घेत जिल्ह्यात मात्र अपयशी ठरलेल्या नेत्यांना पडला  आहे. सोलापूर जिल्ह्यातून आ.प्रणिती शिंदे या एकमेव आमदार विधानसभेत गेल्या. या निवडणुकीतील विजयासाठीही त्यांना शिवसेनेतील बंडखोरीचा मोठा फायदा झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

       २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना राजकारणात नवख्या असलेल्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.संजय राऊत यांनी संपादकीयात नमूद केल्या प्रमाणे सुशीलकुमार शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबियांना पक्षाने सदैव विविध संधी दिलेल्या होत्या व आहेत. त्यामुळे पक्ष अडचणीत असताना निदान सोलापूर जिल्ह्यात तरी पक्षाला उभारी देऊन उपकाराचे ओझे चुकते करण्याची अपेक्षा कॉग्रेसच्या हायकमांडकडून केली जाणे साहजिकच होते पण त्यातही शिंदे परिवार सोलापूर मध्य मतदार संघ सोडता कुठेही फारसा प्रभाव टाकू शकला नाही. 

    विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसपासून फारकत घेऊन आ. भारत भालके हे राष्ट्रवादीत गेले,लोकसभा निवडणुकीत पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे याना मताधिक्य देण्यात आ. भालके यांचा सर्वाधिक वाटा होता. त्याच आ.भालकेंनी स्वतः मात्र कॉग्रेस सोडली ती केवळ या मतदार संघात समाविष्ट असलेल्या दोन्ही तालुक्यातील कॉग्रेसच्या पधाधिकाऱ्याच्या डबलरोल मुळे हे उघड गुपित आहे. या पैकी काहीनि विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी धर्म बाजूला सारत आ. भालेकांचा प्रचार कारणार नाही अशीही भूमिका घेतली पण सुशीलकुमार शिंदे यांनी कधी अशा पदाधिकारी व कार्यकर्यांवरील आपले कृपाछत्र ढळू दिले नाही. मंगळवेढा तालुका कॉग्रेसचे २० वर्षे अध्यक्ष राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक काळूंगे यांनी कॉग्रेसचा पंजा हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. कॉग्रेसचा पंजा हे चिन्ह मिळाल्याने भले कॉग्रेसने झटकून टाकले तरी काळुंगे हे मोठे मते खातील असा विश्वास पंजा हे चिन्ह पाहून गोरगरीब,वयोवृद्ध  व सामान्य मतदार मतदान करतात हा कॉग्रेसच्याच अनेक पदाधिकऱ्यांचा भ्रम विधानसभा निवडणुकीत मोडीत निघाला.  

                 राज्यात सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारच्या प्रसूती वेदनेच्या काळातच सुशीलकुमार शिंदे यांनी कॉग्रेसने शिवसेनेसोबत तडजोड करण्यास उघड विरोध प्रकट केला होता. (कदाचित संजय राऊतांना हि बाब खटकली होती म्हणूनच पुढच्या लढाईसाठी रक्त जपून ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला असावा ) सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेबरोबरच राष्ट्र्वादीतही मोठी नाराजी व्यक्त केली गेली होती.राऊत यांनी नमूद केल्या प्रमाणे कॉग्रेसच्या वाट्याला केवळ १२ मंत्रीपदे असताना रक्ताने पत्र लिहून काय साधले जाणार याचे आत्मभान कॉग्रेसच्या पदाधिकार्यांनी ठेवणे गरजेचे आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *