ताज्याघडामोडी

पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना ; स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक-शिक्षक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करणे तसेच महाविद्यालय व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमात श्री. तानाजी जाधव यांनी पालक प्रतिनिधीत्व भूषविले. विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी प्रास्ताविकातून विभागामध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, तांत्रिक, संशोधन, नवोपक्रम, कौशल्यविकास, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम, उद्योगभेटी, तज्ज्ञ व्याख्याने, कार्यशाळा, आयआयसी अंतर्गत उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, प्रकल्पाधारित शिक्षण, इंटर्नशिप, स्पर्धा परीक्षा व रोजगारक्षमतेच्या दृष्टीने विभागात सुरू असलेल्या उपक्रमांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात शिक्षकांशी संवाद साधून विविध सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. पालकांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.

मेळाव्यादरम्यान व्यासपीठावरील मान्यवर डॉ. यशवंत पवार, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्रीगणेश कदम आणि श्री. तानाजी जाधव यांच्या हस्ते विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.समारोपप्रसंगी डॉ. श्रीगणेश कदम यांनी मनोगत व्यक्त करत पालकांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध सहकार्य केले. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालक-शिक्षक मेळावा यशस्वीरित्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *