ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची निवड

पक्षाच्या जम्बो कार्यकारणीत पंढरपूरच्या नेतृत्वाला संधी

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्याने जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारणीत पंढरपूरचे ज्येष्ठ नेते हनुमंत मोरे यांची वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ३ ऑगस्ट रोजी ही कार्यकारणी प्रसिद्ध केली.

सोलापूर जिल्ह्याचे राजकीय नियोजन सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग करण्यात आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ पश्चिम विभागात समाविष्ट असून या विभागासाठी ३२ सदस्यांची कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी हनुमंत मोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्ह्यासह पंढरपूर-माढा विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातून स्वागत होत आहे.

हनुमंत मोरे हे पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत. पक्षात त्यांनी जिल्हा सहसचिव, सचिव, जिल्हा उपाध्यक्ष तसेच माढा आणि बार्शी तालुक्याचे निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सहकार क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसशी असलेली नाळ अधिक घट्ट केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि पंढरपूर तालुक्याचे माजी अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी तालुका आणि जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याचे काम केले.

हनुमंत मोरे यांची प्रतिक्रिया

“काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती ताई शिंदे आणि जिल्हाध्यक्ष संदीप साठे यांच्या आशीर्वादामुळे ही संधी मिळाली. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे आजवर मोठे सहकार्य लाभले. यापुढेही जबाबदारीने पक्षाचे काम करून काँग्रेसच्या ध्येय-धोरणांना पुन्हा गल्लीपासून दिल्ली पर्यंत पोहोचवणे हे माझे ध्येय असेल,” असे मोरे यांनी सांगितले.

पक्ष संघटना बळकट करणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणे, ही आपली प्राथमिकता असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *