ताज्याघडामोडी

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खरंच अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र,अंबादास दानवे यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे. 

“मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. काही गोष्टींमुळे माझी नाराजी आहे, पण माझ्या नाराजीचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार असा होतो का?” असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. “अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांचं खंडण केलंय. मी शिवसेनेचा स्टार प्रचारक असून लोकसभेत मोठ्या संख्येने आमचे उमेदवार विजयी व्हावे यासाठी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. मी अनेक गावात फिरुन आलो आहे. अजून बराच गावात मी जाऊन दौरा करणार आहे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

“छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बसूनही आमचे काम होईल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो. यासंदर्भात मी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली होती”, असं अंबादास दानवे म्हणाले.”पक्षाने आता खैरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने मी शिवसेनेसोबत एकनिष्ठ म्हणून काम करणार आहे, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात आम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करणार आणि शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडणून आणणार”, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *