ताज्याघडामोडी

‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच बारामतीमध्ये मीच उभा आहे असे समजून मतदान करा अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. यासोबत शेवटी धाडस दाखवल्यानंतरच कामे होतात असे सूचक विधान देखील अजित पवार यांनी केले आहे.

बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतर आहे. लोकसभेला मीच उमेदवार आहे असे समजून तुम्ही मतदान करा अशी विनंती आहे. मी केलेल्या कामाची जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराच्या मागे भक्कम उभे रहा. बारामती कशा पद्धतीने विकास कामे झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. शेवटी धाडस दाखवल्यानंतरच कामे होत असतात,” असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“आता निवडणूक जवळ आली आहे. काही जण तुमच्याकडे येतील. माझी ही शेवटची निवडणूक असल्याचं म्हणतील. त्यांची ही त्यांची अखेरची निवडणूक खरंच असेल का ते मला माहीत नाही. पण तुम्ही भावनिक होऊन जाऊ नका. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही मला निवडणुकीत योग्य पद्धतीनं सहकार्य केलं तर पुढची कामं होतील. नाही तर मी पुढच्या कामांना बांधील नाही,” अशी अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *