लग्नापूर्वी आई झाल्याचे समजल्यास समाजात बदनामी होईल या भीतीपोटी एका युवतीने अर्भकाला निर्दयीपणे संपविले. ही घटना दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या गोकुलनगरात उघड झाली. या घटनेतील युवतीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गडचिरोलीच्या तरुणाचे चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील युवतीशी प्रेमप्रकरण होते. यातूनच युवती गर्भवती राहिली. दोन्हीकडील मंडळींनी लग्नाला संमती दिली. तीन दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी गडचिरोलीला आली असताना नियोजित पतीच्या घरी थांबली. रात्री तिला प्रसववेदना सुरू झाल्या. मुलगी झाली. पण, लग्नापूर्वी आई झाल्याचे समजल्यास आपली बदनामी होईल या भीतीपोटी तिने अर्भकास निर्दयीपणे संपविले.
तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेतील युवतीला ताब्यात घेतले आहे. गडचिरोली रुग्णालयातील तपासणीत तिची प्रसूती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्भक नियोजित पतीपासून जन्मलेलेच आहे का, अर्भकाच्या खून प्रकरणात त्याचा सहभाग आहे का, अशा सर्व बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तिचा नियोजित पतीही संशयाच्या घेऱ्यात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.