गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाइलचं व्यसन अन् मुलगा झाला ‘राक्षस’; आई-बापासह बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या!

तिहेरी हत्याकांडाने राजस्थानातीलनागौरमध्ये खळबळ उडाली आहे. पडुकलान इथं राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने रविवारी कुऱ्हाडीने वार करून आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली.

मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं, असं सागितलं जात आहे. मोहित दिवसातील तब्बल १५ ते १६ तास मोबाईलचा वापर करत असे. एखाद्या हिंसक ऑनलाइन गेमच्या व्यसनातूनच मोहितने हे कृत्य केलं आहे का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केल्यानंतरही मोहितच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावनाही नव्हती. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी मोहितला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत मोहितने एक महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचल्याचं उघड झालं आहे. मात्र त्याने जन्मदात्या आई-वडिलांसह बहिणीची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

रविवारी मोहितने आधी आपल्या आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घरासमोर असणाऱ्या अंगणात आणून टाकले. त्यानंतर त्याच्या वडिलांना जाग आल्याने ते आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यानंतर मोहितने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात मोहितचे वडीलही जागेवरच कोसळले आणि काही क्षणांत त्यांनी आपले प्राण सोडले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *