गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्वत:च्या खोट्या मृत्यूसाठी मित्रालाच संपवलं, 1 कोटी रुपयांसाठी दोस्तच बनला हैवान

सध्याच्या काळात पैसा मिळवण्यासाठी कोण काय करील, याचा काही नेम राहिलेला नाही. चेन्नईमध्ये तर झटपट पैसा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःची विमा पॉलिसी काढली, व स्वतःसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा खून केला. त्यानंतर एक कोटीच्या विमा रकमेवर दावाही केला.

तमिळनाडूत चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तिथे एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या विमा रकमेवर दावा करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. एवढंच नाही, तर संबंधित व्यक्तीने त्याच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची हत्यादेखील केली. दिल्लीबाबू (रा. अयनावरम) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश हरिकृष्णन (रा. अयनावरम) व त्याच्या दोन साथीदारांना अटक केलीय. आरोपी सुरेश आणि कीर्ती राजन यांनी पोलिसांच्या चौकशीत दिल्लीबाबूच्या हत्येची कबुली दिलीय. पोलिसांनी आरोपींना अटक करून सोमवारी, एक जानेवारी 2024 न्यायालयात हजर केलं असता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

सुरेश याची एक कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी होती. हे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी त्याने त्याच्या दोन मित्रांसोबत एक प्लॅन तयार केला. त्यासाठी सुरेश व त्याचे मित्र सुरेश सारखी शरीरयष्टी असणाऱ्या समान वयाच्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. त्या वेळी त्यांना दिल्लीबाबू (रा. अयनावरम) नावाचा व्यक्ती भेटला. दिल्लीबाबूला सुरेश दहा वर्षांपासून ओळखत होता. सुरेश दिल्लीबाबू व त्याच्या आईची नियमित भेट घेऊ लागला व त्याने दिल्लीबाबूची हत्या करण्याचा प्लॅन केला.

सुरेश व त्याचे मित्र 13 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीबाबूला दारू पिण्यासाठी पुद्दुचेरीला घेऊन गेले. त्यानंतर 15 सप्टेंबर 2023 रोजी चेंगलपट्टूजवळच्या एका मोकळ्या भूखंडावर बांधलेल्या एका झोपडीत सुरेश व दिल्लीबाबू दारू पिण्यासाठी बसले. तिथे सुरेशने दारूच्या नशेत दिल्लीबाबूचा गळा आवळून खून केला आणि नंतर झोपडी पेटवून देऊन तो घटनास्थळावरून फरार झाला. दुसरीकडे सुरेश याचा झोपडीला लागलेल्या आगीमध्ये मृत्यू झाल्याचं गृहीत धरून झोपडीत जळालेल्या अवस्थेत असणाऱ्या मृतदेहावर सुरेशच्या कुटुबीयांनी अंत्यसंस्कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *