ताज्याघडामोडी

पुतण्यासाठी कायपण! चक्क केंद्र अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी पुतण्यास कॉपी पुरवली; दोघांवर गुन्हा दाखल

फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा केंद्रावरील देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके (५५, रा. खडकेश्वर), परीक्षार्थी अभिषेक गायके (२४, रा. लासुर स्टेशन) या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टीसीएस कंपनीचे हब ऑपरेशन असलेले वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान दोन शिफ्टमध्ये शहरातील सात केंद्रावर जिल्हा परिषद अंतर्गत फार्मसी अधिकारी पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. फिर्यादी हे विविध केंद्रांना भेटी देत होते. याच दरम्यान, चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील आयओएन डिजिटल झोन येथील परीक्षा केंद्रावरुन केंद्र प्रमुख गणेश औटे यांनी त्यांना फोन केला. सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान दुसऱ्या शिफ्टची ऑनलाइन परीक्षेत परीक्षार्थी अभिषेक गायके याच्या संगणकाजवळ प्रश्नांच्या उत्तराची चिठ्ठी मिळाली. ही चिठ्ठी देखरेख अधिकारी चंद्रकांत गायके याने तेथे टाकली आहे, अशी माहिती फिर्यादीला दिली.

कॉपीचा प्रकार समजताच फिर्यादी पवार पाटील यांनी सदरील केंद्रावर जात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात चंद्रकांत हे परीक्षार्थी एकनाथ याच्या जवळ पाच ते सहा वाजे दरम्यान चार ते पाच वेळेस जाताना आणि एक वेळेस परीक्षार्थी याच्या संगणकाजवळ चिठ्ठी टाकून जाताना दिसून आले. तसेच चिठ्ठी कोठे टाकली हे परीक्षार्थ्यास इशारा करतानाही कॅमेऱ्यात दिसून आले. कॉपीचा हा प्रकार लक्षात येताच पवार पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *