इथेनॉल निर्मितीसाठी उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन घटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे तब्बल ४५ लाख मे. टन साखर अधिक उत्पादन होणार असल्याने संभाव्य दरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
देशात गेल्या पाच-सहा वर्षात ऊसाचे क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढले होते. निर्यातीवरही बंधने घातल्याने साखरेचा उठाव होत नव्हता. त्यातून गोडावूनमध्ये ते पडून राहिल्याने कारखाने अडचणीत येऊ लागले. त्यातून साखर उत्पादनाला मर्यादा घालण्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी रसाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी ३२० लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. ४० लाख मे. टन साखर निर्मीतीचा रस इथेनॉलकडे वळविण्यात आला. इथेनॉलला चांगला दर मिळाल्याने कारखाने आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला.
गतवर्षी १२५० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात आली. यातील सत्तर टक्के निर्मिती ही ऊसाच्या रसापासून करण्यात आली. इतर धान्यापासून तीस टक्के निर्मिती झाली. यंदा मात्र महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यात अनियमित, अवेळी पडलेला पाऊस, दुष्काळ यामुळे ऊसाचे उत्पादन आणि क्षेत्र दोन्हीही घटले आहे. याचा परिणाम म्हणून वीस टक्के उत्पादन कमी होणार असल्याने दरवाढीचे संकेत मिळत होते. त्याला रोखण्यासाठी केंद्राच्या अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने इथेनॉल निर्मितीकडे रस वळविण्यास बंदी घातली आहे. गुरूवारी हा निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.