ताज्याघडामोडी

शेतात अनोळखी मृतदेह, तपासताच भयंकर सत्य समोर, मित्रासोबत मिळून मोठ्या भावानेच रचला कट

सततच्या भांडणामुळे सख्ख्या मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. आकाश रामचंद्र भोयर (वय ३१, रा. सावरी/मुरमाडी) असे मृतकाचे नाव आहे. तर राहुल रामचंद्र भोयर (वय ३३, रा. सावरी) आणि शुभम मारोती न्यायमूर्ती (वय २८, रा. नागपूर) अशी आरोपींची नावं आहेत.

सावरीजवळील खेडेपार रस्त्यालगत ५० फुट अंतरावर शेतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती गावातील मंगेश टिचकुले यांनी रात्री लाखनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे हे घटनास्थळी दाखल झाले. सावरी-खेडेपार रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता.

घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक चमू यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोठा भाऊ राहुल भोयर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

नागपूर येथील शुभम न्यायमूर्ती, राहुल भोयर आणि आकाश असे तिघे जण खेडेपार रस्त्यावरील सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालय परिसरात रात्रीच्या सुमारास गेले होते. आरोपी शुभम याने धारदार शस्त्राने आकाशवर वार केले. आपसी वादातून हत्या केल्याची कबुली राहुल भोयर याने पोलिसांना दिली. पोलिसांनी मंगळवारी दुपारी नागपूर येथून शुभम न्यायमूर्ती याला अटक केली. आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *