पश्चिम बंगालमधील हाबरा येथे दिवाळीच्या मुहूर्तावर एक हृदयद्रावक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून सासरच्यांनी सुनेची हत्या केली. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हाबरा येथील श्रीनगर मठ परिसरात राहणारे 75 वर्षीय गोपाल विश्वास यांना भजी खायचे होते. त्यांची सून मुक्ती विश्वास (वय-40 वर्षे) हिने भजी तयार केले आणि त्यांना कोल्ड ड्रिंकसोबत खाण्यासाठी दिले. परंतु तरीही मुलगा घरी नसताना त्याने आपल्या सुनेची हत्या केली. आरोपी लष्करातून निवृत्त आहे. वडिलांच्या या कृत्यावर मुलाने सांगितलं की, ते नेहमी रागावतात.
रिपोर्टनुसार, सून मुक्तीने भजी तयार करून सासरच्या मंडळींना दिले, त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यही जेवण करून आपापल्या खोलीत गेले. मुक्तीही खोलीत आराम करत मोबाईल बघत होती. तर तिचा मोठा मुलगा कॉमप्यूटरवर काहीतरी करत होता. दरम्यान, मुक्तीच्या धाकट्या मुलाने दिवाळीला कँडल आणण्याचा हट्ट सुरू केला, त्यानंतर मुक्तीचा पती देबू विश्वास मेणबत्त्या घेण्यासाठी घराबाहेर पडला. तो घरी परतला तेव्हा त्याच्या पत्नीच्या खोलीतून आवाज येत होता. त्याने खोलीत जाऊन पाहिलं तर त्याला धक्काच बसला.
त्याची पत्नी मुक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर त्यानी मदतीसाठी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावण्यासाठी मुलाला शेजाऱ्यांच्या घरी पाठवलं. यानंतर सर्वांनी मुक्तीला हाबरा येथील शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा आरोपी सासरा गोपाल विश्वास याला अटक केली.
या घटनेबाबत स्थानिक लोकांनी सांगितलं की, कुटुंबात कोणताही कौटुंबिक वाद किंवा मालमत्तेचा वाद नव्हता. आता गोपाल बिस्वास यांचा मुलगा देबू याने वडिलांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कारण त्यांच्यामुळेच त्याच्या निष्पाप पत्नीला आपला जीव गमवावा लागला. देबूच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील खूप हट्टी होते. ते जे काही बोलतात ते बरोबर आणि बाकीचं जग चुकीचं, असं त्यांना वाटतं.