ताज्याघडामोडी

ते फक्त 4 जण अन् 10 मिनिटांत लुटले 10 कोटींचे दागिने, दिवाळीची बंदूक दाखवून शोरुम केलं खाली!

कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी पाहून कोणीही चक्रावून जाईल. भरदिवसा थोडेथोडके नाही, तर तब्बल 10 कोटी रुपयांचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. ज्वेलरी शोरूमचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कामात व्यग्र होते. डिस्प्लेमध्ये एक एक करून मोठमोठे दागिने सजवून ठेवण्यात आले होते. सणासुदीचा काळ असल्याने शोरूम दागिन्यांनी भरलं होतं; पण ग्राहकांऐवजी दरोडेखोरांनीच हे दागिने लुटले.

राजपूर रोड, डेहराडून इथे रिलायन्सचं ज्वेलरी शोरूम आहे. या गजबजलेल्या बाजारात 11 वाजेपर्यंत ग्राहक येतात आणि त्यामुळे शोरूम 10 वाजेपर्यंत सुरू होतात. 9 नोव्हेंबरलाही हेच झालं. 10 वाजता शोरूम उघडल्यानंतर कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. तेवढ्यात चार जण या ज्वेलरी शोरूममध्ये आले. कदाचित ग्राहक असतील असं कर्मचाऱ्यांना वाटलं. त्यांनी त्यांचं स्वागत केल्यावर ते शोरूममध्ये आले.

तोपर्यंत सगळं काही सुरळीत होतं; मात्र त्यानंतर चार दरोडेखोरांपैकी एकाने खिशातून पिस्तूल काढून थेट सुरक्षारक्षकाच्या कानावर ठेवलं. हे पाहून सगळे घाबरले. कोणाला काही समजण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीनेही आपली बंदूक काढून एका कर्मचाऱ्याच्या कानाला लावली आणि सर्वांना गप्प राहण्याची धमकी दिली. काही वेळातच ज्वेलरी शोरूमचं दृश्य पूर्णपणे बदललं होतं. 

या चौघांजवळ वायर होत्या. त्यांनी तात्काळ शोरूममध्ये उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे हात त्या वायरने पाठीमागे बांधले. शोरूममध्ये काम करणाऱ्या तीन महिला कर्मचारी वगळता इतर सर्वांचे हात बांधलेले होते. आपला धाक दाखवण्यासाठी त्यांनी सुरक्षारक्षकालाही मारहाण केली. दोन हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल होतं. चौघांनीही पटकन शोरूममध्ये असलेले दागिने गोळा केले, सर्व दागिने बॅगेत ठेवले आणि अवघ्या 10 मिनिटांत दुकानातून पळ काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *