ताज्याघडामोडी

चहाची आली लहर, डॉक्टरनं केला कहर; चहा न मिळाल्यानं डॉक्टरनं अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया

चहा दिला नाही, म्हणून नागपूरच्या एका डॉक्टरानं अर्ध्यावरच शस्त्रक्रिया सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, घडलेला प्रकार धक्कादायक असल्यानं या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनानं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चार महिला कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. त्यांना भूल देखील देण्यात आली. मात्र चहा न मिळाल्यानं संतापलेल्या डॉक्टरनं शस्त्रक्रिया अर्ध्यावरच सोडल्या. त्यामुळे या चार महिलांना ताटकळत राहावं लागलं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शस्रक्रिया करण्यासाठी पाचारण करण्यात आलं.

3 नोव्हेंबरला डॉ. तेजरम भलावी हे महिला कुटुंबनियोजनासाठी आलेल्या चार महिलांचे ऑपरेशन सुरू असताना तेथून अचानक गेले. ही बातमी मला फोनवरुन समजली. त्यानंतर मी ताबडतोब नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला आणि लगेच दुसरी टीम पाठवून ते चार ऑपरेशन पूर्ण करायला लावले. नंतर आम्हाला असं कळालं की डॉ. भलावी यांना चहा नाही मिळाला म्हणून ते ऑपरेशन सोडून गेले.

या घटनेची वरिष्ठांकडं तक्रार केल्यानंतर तातडीनं दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. तसंच जिल्हा परिषदेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणात त्रिसदस्य समिती मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *