बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. मराठा समाजातील नेत्यांनी हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला पूर्वीच्या भूमिकेत यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. छगन भुजबळ यांच्यासोबत मला काही बोलायचे नाही. सामान्य मराठा आणि ओबीसी समाज आमच्यासोबत आहे. मला एक माहिती मिळाली ती जर खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. पण मला भेटायला बीडचे काही लोक इथे आले होते. भुजबळांच्या पाहुण्यांचे हॉटेल नातेवाईकांनी फोडले, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचे नेते आंदोलनाला गालबोट लावत आहेत.
भुजबळांच्या पाहुण्यांचे हॉटेल नातेवाईकांनी फोडले सत्ताधाऱ्यांचे नेते आंदोलनाला गालबोट लावत आहे. त्यांची घर त्यांच्याच जवळच्याच लोकांनी फोडली. या जाळपोळीशी मराठा समाजाचं देणंघेणं नाही. आपल्या मुलांना खोट्या केसेस करुन अडकवले जात आहे. काही लोक यासाठी प्रयत्न करत आहेत. काही नेत्यांनी बीडमध्ये जाऊन पोलीस अधीक्षकांकडे नावं लिहून दिली आहेत. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे. मराठा मुलांना आत टाका असं सांगितलं जात आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.