परदेशी नागरिकांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं अनेक कायदे व नियम केले आहेत, मात्र अजूनही त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये. नवी दिल्लीत नुकतीच एका परदेशी महिलेची हत्त्या झाल्याचं समोर आलंय. स्वित्झर्लंडमधील त्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. ही हत्या करणाऱ्यानं अतिशय निर्दयीपणे महिलेला तडफडवून मारलं. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नवी दिल्लीत नुकत्याच घडलेल्या स्वीस महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. स्वीस महिला नीना बर्जर हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने ज्या निर्दयतेनं महिलेची हत्या केली, ते पाहून कोणालाही भीती वाटू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्लास्टिकच्या फॉइलनं तिचा गळा आवळून खून केला आणि तिला तडफडून मारलं. शवविच्छेदन अहवालानुसार, हत्येवेळी महिलेचे हात, पाय आणि तोंड बांधलेलं होतं.
पीडितेला वेदना होत असताना आरोपी असुरी आनंदानं हसत होता. पोलिसांचं म्हणणं आहे, की पीडितेनं स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आरोपीनं तिचा गळा दाबून तिला मारलं. सुमारे 30 मिनिटं ती बचाव करण्यासाठी झगडत होती. आरोपी सतत गळा आवळत असल्यामुळे तिचे डोळेही बाहेर आले होते, पण आरोपी मजा घेत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपीनं मृतदेह गाडीच्या मागच्या सीटखाली लपवून ठेवला आणि काचेवर काळं कव्हर लावलं. मागच्या खिडकीवरही तसंच कव्हर लावून त्यानं मृतदेह गाडीतून नेला. त्यानंतर पश्चिम दिल्लीतल्या टिळकनगर इथल्या एमसीडी शाळेच्या भिंतीजवळ 30 वर्षीय नीना बर्जर हिचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह गेल्या शुक्रवारी आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय साखळदंडानं बांधून त्याला कुलूप लावलेलं होतं.
त्या मृतदेहाचं 28 ऑक्टोबरला शवविच्छेदन करण्यात आलं. स्वीस दूतावासाकडून एनओसी मिळाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात तीन डॉक्टरांची वैद्यकीय समिती तयार करण्यात आली.