गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईलवरुन वाद, बीपी वाढल्याने आई बेशुद्ध पडल्याचा दावा, पोस्टमार्टम करताच मुलाचे पितळ उघडं पडलं, अन्..

नागपूर शहरातील संत गजानन महाराज नगर येथे मुलानेच आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घडली. रामनाथ वडवाईक असे आरोपी मुलाचे नाव आहे. रामनाथ गुलाबराव बडवाईक याने दारूच्या नशेत स्वत:ची आई कमलाबाई गुलाबराव बडवाईक यांची हत्या केली. लहान भावाला आईच्या गळ्यावर जखमा दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमलाबाईला ३ मुले आहेत पण त्या रामनाथ याच्याकडे राहत होत्या. रामनाथ मजदूरीचे काम करायचा. त्याचे लग्न झाले आहे मात्र, रामनाथला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी राहते. १८ ऑक्टोबरला सकाळी कमलाबाई आपल्या मुलासोबत बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याने वाटेत एका वाईन शॉपमधून दारू आणली. त्यानंतर आई आणि मुलाने घरी जाऊन दारू प्यायली.

त्यानंतर मोबाईल देण्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि या भांडणात रामनाथने आईचा गळा दाबून खून केला. यानंतर आरोपीने आईचा बीपी वाढल्याने ती बेशुद्ध असल्याची बतावणी करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून खासगी रुग्णालयात नेले. मात्र महिलेचा मृत्यू झाल्याने तेथून त्यांना मेडिकल रुग्णालयात जाण्यास सांगितले. आरोपीने मृतदेह मेडिकल रुग्णालयात नेण्याऐवजी घरी आणला.

आईच्या मृत्यूची माहिती समजताच लहान भाऊ दीपक व इतर नातेवाईक घरी पोहोचले. मृत्यूनंतर कमलाबाईंच्या अंगात जडपणा वाढत होता. अशा स्थितीत हात आणि पायाला कापूर, तुप आणि तेल लावायला सांगितले. हे करत असताना त्यांना कमलाबाई यांच्या गळ्यावर जखमा दिसल्या. कमलाबाईच्या अंगावर मंगळसूत्र आणि इतर कोणतेही दागिने नव्हते. संशयावरून ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये महिलेचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *