ताज्याघडामोडी

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं

कौटुंबिक वादातून पोलिस पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा खून करून पतीने स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी चिखलीत घडली. या घटनेत मोठी मुलगी शाळेत गेली असल्याने ती बचावली. जिथे हे हत्याकांड घडलं, त्या बंगल्याचं नाव ‘हृदय’ होतं.

चिखली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत वर्षा कुटे (३७) या पती किशोर व दोन मुलींसह शहरातील पंचमुखी महादेव मंदिराजवळ वास्तव्याला होत्या. सोमवारी अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गांगलगाव रोडवर कवठळ शिवारातील विहिरीत एक अनोळखी व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या विहिरीशेजारीच एमएच-९९७२ क्रमांकाची दुचाकीही सापडली. दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता ती वर्षा यांची असल्याचे समजले.

पोलिसांनी वर्षा यांचा भाऊ संतोषशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. त्यांनी सदर मृतदेह जावई किशोर कुटे यांचा असल्याचे सांगितले. ही माहिती बहिणीला देण्यासाठी संतोष हा वर्षा यांच्या निवासस्थानी पोहोचला. घराचे दार उघडताच वर्षा आणि चिमुकली भाची कृष्णा (वय २) रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकास पाचारण करून मायलेकींचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

वर्षा कुटे या पोलिसात नोकरीला असल्याने आर्थिक स्थैर्य आले होते. दोन मुली असल्याने त्यांना हक्काचे घर देण्याचे स्वप्न पाहिले. भाड्याने राहत असलेल्या भागातच काही दिवसांपूर्वी त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले. दिवसागणिक वाढत्या कामासोबत त्यांच्या स्वप्नांचे इमलेही चढत होते. रोज कामावरून परतल्यानंतर घराच्या बांधकामावर चर्चा व्हायची. मुलींनाही चर्चेत सहभागी करून घेतले जात होते. सारे काही आनंदात सुरू असतानाच सोमवारी अचानक वाद झाला. हा वाद इतका वाढला की किशोर यांनी पत्नी वर्षा आणि दोन वर्षांच्या कृष्णाची हत्या केली. नंतर आत्महत्या करीत स्वत:लाही संपविले. आनंदाचे चढते इमले क्षणात कोसळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *