ताज्याघडामोडी

बैल विहिरीत पडला, वाचवण्यासाठी ९ जण विहिरीत; तितक्यात आक्रित घडलं, ६ जणांचा करुण अंत

बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिल्ली मुरी ओपी परिसरातील पिस्का गावात ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेले सगळे जण एकाच गावातील आहेत. एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गावात पाऊस सुरू होता. त्यामुळे विहिरीजवळील माती ओलसर झाली होती. मातीवरुन घसरुन बैल विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी ९ जण विहिरीत उतरले. दोरीनं बैलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तितक्यात वरुन माती कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली नऊ जण अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बचावासाठी मदतकार्य सुरू होतं. विहिरीत अडकलेल्या तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. तर सहा जण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक गावात पोहोचलं. मात्र सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्य रात्री १ वाजता सुरू झालं. या दरम्यान विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात आलं. त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. या दुर्घटनेत विक्रांतच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *