ताज्याघडामोडी

हुंडा न देऊ शकल्यामुळे तरुणीची आत्महत्या, व्हिडिओद्वारे व्यथा मांडली

उत्तर प्रदेशच्या बदायूँ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने वरपक्षाने लग्नापूर्वी जास्त हुंडा मागितल्याने आत्महत्या केली. सरकारी नोकरीत असलेल्या या तरुणाने लग्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर हुंड्याची मागणी वाढवत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे लग्न पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने व्हिडीओ बनवून आपली व्यथा मांडली. पोलिसांनी याची माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.

माहितीनुसार, वजीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बागोल गावात राहणारा विकास या तरुणाचा सपनाशी विवाह निश्चित झाला होता. सपनाने रविवारी रात्री उशिरा आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, ‘तिचे लग्न 22 एप्रिल 2023 रोजी होणार होते. लग्नपत्रिका छापून त्यांचे वाटपही करण्यात आले. घरात लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान, 2 एप्रिल रोजी विकासने फोन करून आणखी हुंड्याची मागणी केली. जे तिचे कुटुंब पूर्ण करू शकले नाही. त्यांनी विकासला समजावले पण तो मान्य झाला नाही. विकास सतत फोनवरून मानसिक छळ करत होता. या सर्व प्रकारामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.’

आत्महत्येपूर्वी तरुणीने आणखी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत ती म्हणाली की, ‘लग्न न केल्यामुळे संपूर्ण समाज तिची बदनामी करत आहे, जे तिला सहन होत नव्हते. मी या कलंकासह माझे संपूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. आई-बाबा मला माफ करा’, असे तिने म्हटले आहे. तिने हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि त्यानंतर आत्महत्या केली.

या प्रकरणी मुलीचे वडील जगबीर सिंह सांगतात की, हे लग्न वर्षभरापूर्वीच ठरले होते. 22 एप्रिलला लग्न होणार होते. हुंडा देण्यासाठी मुलाच्या पालकांकडून २१ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या 20 दिवस आधी त्यांनी आणखी 30 लाख रुपये आणि कारची मागणी केली. आम्ही यासाठी असमर्थता दर्शवताच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. आम्ही लग्नपत्रिकांचे वाटपही केले होते’, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हा तरुण आयकर कार्यालयात कारकून आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. सध्या तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *